दूध भेसळ प्रतिबंधक समितीने धाड टाकून केला समृद्धी मिल्क व फूड प्रोसेसिंग प्लॉटचा भांडाफोड

कळंब/जयनारायण दरक-
कळंब तालुक्यातील रत्नापूर येथे
दूध भेसळ होत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी जिल्हास्तरीय दूध भेसळ रोखणाऱ्या समितीने 25 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेसहा वाजता अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक गौहर हसन, अन्न व प्रशासनाचे निरीक्षक, वजन व मापे अधिकारी, प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर आणि संरक्षणार्थ दहा ते पंधरा पोलीस यांच्यासह पथकाने धाड टाकून कारवाई केली.
रत्नापूर येथील समृद्धी मिल्क अँड फुड प्रोसेसिंग प्लॉट या प्रकल्पावर जिल्हास्तरीय दूध व्यवसाय समिती पथकाने धाड टाकली असता घटनास्थळी शेडमध्ये सर्वत्र अस्वच्छता दूध उत्पादने, कुल्फी, बदाम शेक बनवण्यात येत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. अतिशय अस्वच्छ वातावरणात दूध उत्पादने बनविण्याची प्रक्रिया होत असल्याची दिसून आले. त्यामध्ये बदाम शेक, खवा, प्रोटीन पावडर हे पदार्थ आढळून आले. पदार्थाचे नमुने काढून अन्न व औषध प्रशासनामार्फत पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या प्रकल्पावर बदाम शेक व एक स्टेनलेस स्टीलला बुरशी लागलेली असल्याचे दिसून आले. यावेळी बदाम शेक नष्ट करण्यात आला. या प्रकल्पावर एक वजन काटा मुद्रांकित नसल्याने वजन माफी अधिकारी यांनी प्रकल्पावर दंडात्मक कारवाई केली. या प्रकल्पात आढळून आलेले पदार्थ अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करण्यात आले. प्रकल्पाचा परवाना निलंबित करण्यात आला. पुढील आदेशापर्यंत प्रकल्पामध्ये दूध व दूध जन्य पदार्थाच्या उत्पादन/विक्रीवर प्रतिबंधक लावण्यात आला आहे. ही कारवाई दूधव्यवसाय व पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आली. सदर कारवाई विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. आयुक्त पशुवर्धन विभाग व आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.