जातीय अपमान आणि धमकी प्रकरणात ग्रामसेवकाची तक्रार; उपसरपंचाच्या सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
तेरणा काठ न्युज
धाराशिव जिल्ह्यातील हशेगाव येथे नियुक्त असलेल्या ग्रामसेवक प्रतीभा दिलीप सरवडे यांच्या विरोधात गंभीर जातीय अपमान आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली उपसरपंचाचे सासरे, राजाभाऊ कुंडलिक मालगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेब्रुवारी ते जून २०२३ दरम्यान प्रतीभा सरवडे यांची हशेगाव, शिराढोण येथे ग्रामसेवक म्हणून नियुक्ती होती. या दरम्यान, राजाभाऊ मालगे यांनी सरवडे यांचा जातिवाचक अपमान करून त्यांना कमीपणाची वागणूक दिली. ग्रामसेवक सरवडे (महार समाज) यांची जात विचारात घेऊन, मालगे यांनी त्यांचा अवमान केला असल्याचे सांगितले जाते..या घटनेनंतर, विभागीय चौकशी दरम्यान २६ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात जात असताना पुन्हा एकदा मालगे यांनी जातिवाचक शब्द वापरून सरवडे यांना धमकावले.प्रतीभा सरवडे यांनी तत्काळ सिटी चौक पोलिस ठाणे, औरंगाबाद येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९७९ आणि भारतीय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ३५१ आणि ३५२ नुसार एफआयआर क्र. ३२४/२०२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.