कळंब येथील सार्वजनिक बांधकाम उप विभागातील रिकाम्या खुर्चिला छावा संघटनेच्या वतीने हार घालून केला निषेध
रस्ता दर्जेदार न केल्यास संघटनेच्या वतीने करणार आंदोलन

कळंब /जयनारायण दरक-
कळंब तालुक्यातील गोविंदपुर ते खामसवाडी मोहा मार्गे रामगड रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार धाराशिव जिल्हा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कळंब यांच्याकडे केली होती. परंतु संबंधित अधिकारी यांनी या प्रकरणी कुठलीच कारवाई न केल्यामुळे दि ५ डिसेंबर २०२३ रोजी बांधकाम अभियंता कळंब यांच्या मोकळ्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.
खामसवाडी ता कळंब येथील जाणाऱ्या गोविदपुर मोहा मार्गे रामगड या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आसुन सर्व खड्डे पुढे बुजवले जातात व मागे उखडले जात आहेत.तसेच डांबराचा ही कमी प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी बांधकाम उपविभाग कळंब येथील आभियंता यांना लेखी तक्रार दिली होती. परंतु संबंधित आधिकारी यांनी कसलीच दखल घेतली नसल्यामूळे छावा संघटनेच्या वतिने दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला आहे. तसेच खामसवाडी- मंगरुळ मार्गे पिंपळगाव या रस्त्यावरील ही खड्डे बुजण्याचे काम सुरू असून त्याही रस्त्याची अशीच अवस्था असुन गेल्याच वर्षी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. हा रस्ता ही काही दिवसांतच उखडला होता. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डयांत मुरुम भरला होता. त्यानंतर सद्यस्थितीत गेल्या ५ दिवसापासुन या रसत्यावर खड्डे भारण्याचा कार्यक्रम सुरू आहे. दर वर्षी या रस्त्याचे काम चांगले व दर्जेदार गुत्तेदार यांच्या कडुन करुन घ्यावे अशी नागरीकांची मागणी होत आहे. परंतु अधिकारी व गत्तेदार यांच्या संगनमताने अशी कामे होत असल्याची चर्चा नागरिकांतुन होत आहे. तर वारंवार निवेदने देऊनही एकही अधिकारी या रस्त्याकडे फिरकत नसल्याने या विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे. सदरील रस्ते व्यवस्थित व दर्जेदार नाही झाल्यास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिला आहे.या वेळी मानवहित लोकशाही पक्षाचे कळंब तालुका अध्यक्ष धनंजय ताटे,छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव, विशाल शेळके यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.