ताज्या घडामोडी

सहकारातून समाजाचा सर्वांगीण विकास शक्य

धाराशिव (प्रतिनिधी)

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास होण्यासाठी सहकाराची आवश्यकता आहे. ‘विना सहकार नाही उद्धार’ हे सर्वार्थाने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी काम करणाऱ्या सहकार भारतीसोबत जोडून काम करण्याची गरज सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी व्यक्त केली.
प्रारंभी भारत माता आणि स्वगीय लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.इफको या आशिया खंडातील सर्वात मोठ्या इफको या कंपनीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल कळंब येथील डॉ. वर्षा कस्तुरकर यांचा सहकार भारतीच्या वतीने येथे सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, अखिल भारतीय सेवा भारतीच्या सचिव चंद्रिका चव्हाण, सहकार भारतीचे धाराशिवचे अध्यक्ष संतोष तौर, उपाध्यक्ष उद्धव गपाट, जिल्हा मंत्री डॉ. हर्षल डंबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पाचपोर म्हणाले, ज्या सहकार चळवळीची सुरुवात झाली, त्या सहकार चळवळीला गती देण्याची गरज आहे. सर्व क्षेत्रांत सहकारी संस्था स्थापन करून आर्थिक परिवर्तनाची ताकद सर्वसामान्यांच्या हातात यावी, यासाठी सहकार भारती कार्य करत आहे. ‘विना संस्कार नाही सहकार’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून सहकार क्षेत्रातल्या संस्थांचे जाळे उभारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे यावे. सेवा पुरवठादार, तसेच शेती आणि शेती प्रक्रिया क्षेत्रात
अन्नप्रक्रिया उद्योग, वाहतूक यांसह विज्ञान तंत्रज्ञान आणि सर्वच क्षेत्रांत सहकारी संस्थांच्या उभारणीला मोठा वाव असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविकात संतोष तौर म्हणाले की सहकार भारतीच्या धाराशिव जिल्ह्यातल्या कार्याची सुरुवात असून, आगामी काळात सर्व घटकांसाठी काम करण्याचे सूतोवाच केले. डॉक्टर हर्षल डंबळ यांनी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी सहकार भारतीसोबत येऊन काम करण्याचे आवाहन केले. अभिलाष लोम यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी आभार डॉ. हर्षल डंबन यांनी मानले.. कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तसेच कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.