पळसप येथे शुक्रवारी एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन

पळसप येथे शुक्रवारी (दि.२) ९ वे एकदिवशीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शिक्षक आमदार स्व. वसंतराव काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिका अंजली धानोरकर या राहणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा शिक्षक आ. विक्रम काळे यांनी दिली आहे. या संमेलनाची सुरूवात शुक्रवारी सकाळी ८ वाजता पळसप गावात डॉ संजय कोरेकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीच्या उद्घाटनाने होणार आहे. त्यानंतर १० वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ अशोक नाईकवाडे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे तर १०.१५ वाजता प्रसिद्ध चित्रकार प्रकाश घादगिने व मंगेश निपाणीकर यांच्या चित्रांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते व साहित्यिका अंजली धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री महादेव जानकर राहणार आहेत. उद्घाटनानंतर दुपारी १.३० वाजता राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी व कृषिपुरक व्यवसाय, काळाची गरज या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता गेणु शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे. तर त्यानंतर प्रा महेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचा समारोप सायंकाळी ६ वाजता होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ शेषेराव मोहिते, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. बाबासाहेब पाटील, आ. सतिश चव्हाण, आ. कैलास पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने या एक दिवशीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाची सांगता होणार आहे.या सर्व कार्यक्रमांचे साहित्यप्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष तथा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले आहे.