गुटखा वाहतूक वाहनलुटीचे प्रकरण सपोनि हजारेंना भोवले:: येरमाळा पोलीस ठाण्यातून महिन्यातच उचलबांगडी तर सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे काय ?

येरमाळा येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी सापोनि विलास हजारे यांची महिन्या भरातच उचल बांगडी झाली आहे.सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनलुटीच्या प्रकरणात जिल्हा पोलिस प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.त्यात महिन्याभरापूर्वी गुटखा वाहतूक टेम्पो लुटीच्या प्रकारात पोलिसच वाहन लुटायला सांगतात असे आरोप लुटारूंनी पोलिसांवर केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्हा पोलिस प्रशासनावर निर्माण झालेल्या प्रश्न चिन्हावर शिक्का मोर्तब झाले होते.या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले होते.त्या प्रकरणात हजारे यांची उचल बांगडी कारवाई झाली असली तरी राष्ट्रीय महामार्गावरील लुटीत अधिकाऱ्यांचे हात असल्याचे बोलले असल्याने अधिकारी बदलुन महामार्गावरील वाहन लुटीचे प्रकाराला आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला यश येईल का असा सवाल केला जात आहे.
येरमाळा परिसरातील पोलीस ठाणे हद्दीत नरसिंह साखर कारखाना ते येडशी टोलनाक्या पर्यंत चालत्या वाहनातून माल चोरीचे प्रकार दररोज घडत आहेत.या प्रकारात कांहीं खाजगी वाहनधारकांची वाहने अडवून मोबाईल,सोने,रोख रक्कमेच्या जबरी चोऱ्याचे प्रकारही घडले आहेत.गेल्या महिन्यात एक वाहन लुटत असताना त्यात गुटखा असल्याचे उघड झाले,पोलिसांच्या समक्ष हा प्रकार सूरु होता की पोलिसांनी उघड केला हा संशोधनाचा विषय ठरत आहे.सदरील प्रकारचे चोरांनीच व्हिडिओ शूटिंग करुन सरळ सरळ पोलिसांनी आम्हाला वाहन लुटायला सांगीतल्याचा प्रकार समोर आल्याने महामार्गावरील वाहन लुटीत आधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे निघाले.राष्ट्रीय महामार्गावरील वाहने एवढ्या सहज लुटली जातात की त्यावरुन पोलीस प्रशासनाचे या लुटिशी कांहीं लागे बांधे आहेत की काय अशी कांहीं दिवसांपासून चर्चा होती.
गेल्या महिन्यात वाहन लुटीच्या प्रकारात व्हायरल व्हिडिओ वरुन नुकतेच महिनाभरापूर्वी जिल्हा बदली होऊन येरमाळा पोलीस ठाण्यात रुजू झालेले सपोनि विलास हजारे यांची उचल बांगडी करण्यात आली असुन नवीन सापोनि महेश क्षीरसागर यांची नेमणूक करण्यात आली आहे .
अधिकाऱ्यांना सजा कर्मचारी मोकाट
गुटखा वाहन लुटी प्रकरणात सपोनि विलास हजारे यांच्यासोबत दोन पोलीस कर्मचारी असल्याचे चोरट्यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले परंतु केवळ पोलीस अधिकारी विलास हजारे यांच्यावरच गडांतर आले या दोन कर्मचाऱ्यांचे काय असा नागरिकांचा सवाल मात्र पोलिस प्रशासनाने अनुत्तरितच ठेवून दिला आहे