जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडीच्या तगड्या लढतीत विजयाची माळ अखेर कोणाच्या वाट्याला येणार ?

तेरणा काठ न्युज
उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या ऊमेदवारांना मोठ्या मताधिक्याने पिछाडी मिळाली होती. त्यामुळे होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात महायुतीविरूद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारांत काट्याची टक्कर होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवारांला तुळजापूर विधानसभा मतदारसंघ व परंडा विधानसभा मतदारसंघात मोठ्या मतांची पिछाडी मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे महाराष्ट्रातील सगळ्यांचे विशेष लक्ष वेधले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारांत तगडी फाईट सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अजीत पिंगळे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे शिलेदार कैलास पाटील यांच्यात सामना रंगला आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसचे धीरज पाटील मैदानात उतरले आहेत. उमरगा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार प्रविण स्वामी टक्कर देत आहेत. भूम -परंडा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार तथा धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या तुतारीचे उमेदवार राहुल मोटे शर्थीने खिंड लढवित आहेत.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडीच्या तगड्या लढतीत विजयाची माळा अखेर कोणाच्या वाट्याला येणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.