उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी अर्चनाताई पाटील यांना जाहीर झाल्याने शिवसेनेचे धनंजय सावंत बंडाच्या पावित्र्यात ?

धाराशिव लोकसभेसाठी महायुतीकडून राष्ट्रवादीची उमेदवारी अर्चनाताई पाटील यांना जाहीर झाल्याने धनंजय सावंत बंडाच्या पावित्र्यात असल्याचे सांगितले जाते. तसेच ते वंचित आघाडीकडून मैदानात उतरणार असल्याची चर्चाही कार्यकर्त्यांकडून ऐकण्यास मिळत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव लोकसभेसाठी शिवसेना नेते आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात फिल्डींग लावली असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे खंदे समर्थक व अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ना.तानाजीराव सावंतांनी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. तसेच लोकसभा मतदारसंघातील कानाकोपरा ना.सावंतांनी पिंजून काढला असल्याचेही सांगितले जात आहे. ढोकी येथे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची तगडी सभा घेऊन शक्ती प्रदर्शनही केले होते. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून धनंजय सावंत यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत होते. मात्र ऐनवेळी अर्चनाताई पाटील यांचा
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेऊन त्यांची घड्याळ चिन्हावर महायुतीकडून उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेनेच्या गोटात मोठा अस्वस्थता पसरली आहे. धनंजय सावंतांची उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तर थेट पक्षाचे राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीत धनंजय सावंत वंचित आघाडीकडून मैदानात उतरणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. म्हणून धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीसह महाविकास आणि वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी रंगतदार सामना होतो की काय ? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.