विद्यानिकेतन हायस्कूल मध्ये नृत्यकलाविष्कारात विद्यार्थ्यांनी केली मौजमजा

तेरणा काठ वृत्तसेवा —
येरमाळा येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात नृत्य कलागुणाचे सादरीकरण केले
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचे संचालक बाबुराव मैदर्गे म्हणाले की,सध्याच्या स्पर्धात्मक युगात पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन देऊन सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या उच्च शिक्षणासाठी फाॅऊंडेशन कोर्स ही काळाची गरज बनली आहे.विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये यावर्षीपासून हा कोर्स सुरू होत असून, याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन ही उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना केले.यावेळी जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के. वाय. इंगळे, माजी सभापती विकास बारकुल, दत्तात्रय बोधले,विद्यानिकेतन स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील आणि स्वाती पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लोकगीते, लावण्या, मराठमोळी गीते आणि हिंदी चित्रपट गीतांवरील नृत्याविष्कार सादर करत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे प्रभावी प्रदर्शन केले. संपूर्ण स्टेजच्या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. नंदिनी प्रमोद पाटील, राजनंदिनी बांगर, सलोनी देशखैरे, मयुरी जोगी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख उषा बारकुल, रेखा वाघमारे, वसतिगृह अधीक्षक बावकर, गायकवाड, तसेच इंटरनॅशनलच्या प्राचार्या प्रियांका काकडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वर्षा पवार आणि संपूर्ण शिक्षकवृंदांनी विशेष मेहनत घेतली.या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.कार्यक्रमात सचिन पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रोहिणी शिंदे आणि भाग्यश्री पाळवदे यांनी केले, तर शेवटी आभार लोंढे यांनी मानले.